राहुल शिंदे
पुणे: लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणा-या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Council Of Examination) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिक व महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली जातात. त्यामुळे राज्य शासनाचे परीक्षा परिषदेकडे झालेले अक्षम्य दूर्लक्ष आणि परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली असली तरी सुमारे चार-पाच वर्षांपासून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) , अनेक शिष्यवृत्ती परीक्षा, टायपिंग परीक्षा, डी. एड परीक्षांसह विविध परीक्षा घेतल्या जातात. राज्यातील विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून परिषदेकडे गोडाऊनसाठी स्वतंत्र व मोठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे परिषदेने पत्र्याचे गोडाऊन तयार केले आहे. त्यात पेट्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ठेवल्या जातात.परिणामी लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य परिषदेने पत्र्याच्या गोडाऊनमध्ये बंद करून ठेवणे योग्य आहे का ? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
परीक्षा परिषदेने विविध परीक्षा घेऊन स्वत:च्या आर्थिक उत्पन्नात वाढ केली. त्यामुळे सुमारे 2016 मध्ये परिषदेकडे सर्व सुविधा असणारी सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही निधीची अपेक्षा न करता परीक्षा परिषदेने स्वत:कडील निधी तरतुद इमारतीसाठी केली. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरी घेण्यात आली. त्यामुळे परिषदेने भक्कम गोडाऊन न बांधता पत्र्याचे गोडाऊन बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु, अद्याप बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली नाही.
परिषदेच्या बाहेर पत्र्याच्या पेट्यांचा ढीग-परिषदेकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मुख्य कार्यालायाच्या समोरील मोकळ्या जागेत पत्र्याच्या पेट्या ठेवल्या जातात. त्यानंतर जवळच असलेल्या गोडाऊनमध्ये त्या ठेवल्या जातात. बदल्या हवामानामुळे या पेट्या पाण्यात भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पत्र्याच्या गोडाऊनमध्ये पेट्या सुरक्षित ठेवणे योग्य आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.