Exclusive: भाजपा-शिवसेना यांच्यात पुल बांधणार का?, गडकरींनी नेमकं उत्तर दिलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:27 PM2022-03-26T23:27:46+5:302022-03-26T23:29:36+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
पुणे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर महत्वाचं विधान केलं आहे. राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील राजकीय द्वंद्व संपुष्टात येऊन भविष्यात पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये पुल बांधण्याचं काम नितीन गडकरीच करू शकतात असं विचारलं असता नितीन गडकरी यांनी स्पष्ट उत्तर दिलं. "जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. सध्या मी नॅशनल हायवे बांधत आहे", असं उत्तर देत आपलं सध्या राष्ट्रीय राजकारणाकडेच लक्ष असल्याचं सूचित केलं.
राजकारणातील सध्याच्या आक्रस्ताळेपणाबद्दल विचारलं असता गडकरींनी आपण एकमेकांच्या विचारांचे विरोधक होऊ शकतो पण शत्रू होऊ शकत नाही. विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त धोकादायक आहे, असं महत्वाचं विधान केलं. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी गडकरींनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यात पहिल्याच प्रश्नात गडकरींनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. भाजपा आणि शिवसेना यांच्यात सध्या जो वितुष्ट निर्माण झाला आहे तो दूर करण्याचं काम फक्त नितीन गडकरीच करू शकतात असा विश्वास अनेकांना वाटतो. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील पुल गडकरी बांधणार का?, असं गडकरींना विचारण्यात आलं. त्यावर गडकरींनी एका क्षणात उत्तर दिलं. "जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. माझ्याकडे सध्या राज्यातले आणि जिल्ह्यातले रस्ते बांधण्याचं काम नाही. मी नॅशनल हायवे बांधतो. मी बाकीच्या गोष्टींबद्दल फार विचार करत नाही. प्रत्येकजण त्या त्या गोष्टीसाठी सक्षम असतो", असं गडकरी म्हणाले.
काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा
"लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधी पक्ष. त्यामुळे माझी मनापासून इच्छा आहे की काँग्रेस पत्र मजबूत व्हायला हवा. पण सध्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस पक्षाची जागा एक स्थानिक पक्ष घेत आहे हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षानं मजबूत असणं खूप गरजेचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरु एक उत्तम उदाहरण आहेत. अटलबिहारी वाजपेयी निवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही पंडितजींनी त्यांचा सन्मान केला होता. त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्षाचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि काँग्रेस पक्षानं मजबूत व्हायला हवं", असं नितीन गडकरी म्हणाले.