लोणावळा : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अंडा पाॅइंटजवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास सहलीसाठी आलेली एक लक्झरी बस पलटी झाली. या बसमध्ये ४८ विद्यार्थी होते. यापैकी दोन विद्यार्थ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर ४६ विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. जखमींपैकी ११ जण गंभीर जखमी आहेत.
अपघातामधील जखमींना खोपोली, पनवेल भागातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. चेंबूर येथील मयांक या एका खासगी क्लासचे विद्यार्थी लक्झरी बस क्रमांक एमएच ०४ जीपी २२०४ मधून लोणावळ्यातील वेट अँड जाॅय येथे आले होते. परतीच्या प्रवासात असताना खंडाळा घाटातील वळणावर बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला होता.
अपघाताची माहिती समजताच बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल होत जखमी मुलांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मयतांमध्ये एक मुलगा व एका मुलीचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात लोहगड किल्ल्याजवळील वळणावर देखील अशी शालेय सहलीची बस दरीत पडली होती. सुदैवाने त्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
सध्या शालेय सहली विविध भागात जात आहेत. या सहली शक्यतो विद्यार्थी संख्या जास्त असल्याने खासगी अथवा सरकारी बसमधून जातात. बस चालकांनी अथवा मालकांनी बस सहलींसाठी देताना त्यांचा फिटनेस चेक करणे गरजेचे आहे. चालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.