पुणे: ऍपद्वारे बिला ची रक्कम दिल्याचे खोटे सांगून सराफ नऊ व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शहरातील नऊ सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोटार असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशाल माणिक घोडके (वय २८, रा. होले वस्ती, उंड्री, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ऍपद्वारे पैसे चुकते केल्याच्या बतावणीने दागिने खरेदी करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. चोरट्याने गेल्या दोन महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या भागातील सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली होती. हडपसर भागातील एका सराफी पेढीतून घोडके सोन्याची अंगठी खरेदी केली होती. अॅपद्वारे पैसे दिल्याचे सांगून त्याने ऑनलाइन व्यवहारातील स्क्रीनशॉटमध्ये तांत्रिक फेरफार करून फसवणूक केली होती.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रशांत दुधाळ, सूरज कुंभार यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनंतर घोडकेला उंड्री भागात पकडले. प्राथमिक तपासात घोडकेने हडपसर, वानवडी, चंदननगर, भारती विद्यापीठ तसेच जेजुरी परिसरातील सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून मोटार आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद गोकुळे, विश्वास डगळे यांनी ही कारवाई केली.