पुणे: टेरेसची चावी ठेवण्याच्या बहाण्याने घरात घसून दुकान मालकाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय इसमावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये घडला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (५ नोव्हेंबर) सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिवाजी महिपती कोंडेकर (५५, रा. धायरी) याच्यावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोंडेकर याचे फिर्यादी यांच्या बिल्डिंगखाली दुकान आहे. कोंडेकर हा टेरेसची चावी देण्याच्या बहाण्याने आला. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला त्याने दरवाजा उघडण्यास सांगितला.
मुलीने दरवाजा उघडल्यानंतर कोंडेकरने घरात घुसत फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. मुलीने त्याला विरोध केला तरी त्याने जबरदस्तीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साबळे या करत आहेत.