पाटस : भीमा-पाटस साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांचे वर्तन उद्धट आहे. तेव्हा त्यांचा राजीनामा घ्यावा; अन्यथा सभा होऊ देणार नाही, अशी मागणी सभासदांनी केल्याने वातावरण काही काळ तंग झाले होते. कारखान्याची १७वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या, तर काही काळ ताणतणावाच्या वातावरणात झाली. शेतकऱ्यांच्या उसाचा भाव गुलदस्तातच राहिला. संचालक पाटील यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत विषयपत्रिकेवरील विषय वाचू नका, असा आग्रह भाजपाचे ज्येष्ठ नेते तानाजी दिवेकर, अरविंद गायकवाड यांनी धरल्यामुळे सभेच्या सुरुवातीला वातावरण तापले होते. सभासद महत्त्वाचे की कार्यकारी संचालक, असा प्रश्न तानाजी दिवेकर यांनी उपस्थित केला. यावर राहुल कुल म्हणाले, की तुमच्या विनंतीला मान देईन; परंतु विषयपत्रिकावाचन होऊ द्या. तसेच, कुठल्याही सभासदाने कागद मागितला, तर तो त्यांना दिला पाहिजे, अशाही सूचना कार्यकारी संचालकांना देण्यात आल्या आहेत, असे कुल यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. कारखान्याचे कामगार आणि तोडणी वाहतुकीचे प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार उसाचा दर ठरवावा लागेल. त्याप्रमाणे शासनाच्या धोरणानुसार उसदराबाबत निर्णय घेऊ, असे कुल म्हणाले.या वेळी अरविंद गायकवाड म्हणाले, की ६ महिने झाले सभासदांचे पैसे दिले नाहीत, तेव्हा आम्ही कसे दिवस काढायचे? भाजपाचे ज्येष्ठ नेते तानाजी दिवेकर म्हणाले, की लेखापरीक्षण अहवाल कार्यकारी संचालकाकडे मागितला तर त्यांनी तो दिला नाही. तसेच, कामगारांना पगार नाही. तर राजाभाऊ बुऱ्हाडे म्हणाले, की कार्यकारी संचालकाला राजीनामा घेण्याचा ठराव झाला पाहिजे. त्यांना अहवाल वाचू देऊ नका. कुल यांच्या स्पष्टीकरणानंतर संचालक विकास शेलार यांनी अहवाल वाचला. भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे राहुल कुल यांना म्हणाले, की तुम्हाला भीमा-पाटसच्या निवडणुकीत सभासदांनी निवडून दिले म्हणजे तुमच्यावर सभासद खूष आहेत, असे समजू नका. तुम्हाला सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. या वेळी दीपक दिवेकर, लक्ष्मण चव्हाण, सुनील फरगडे, मोहन जगदाळे, नितीन म्हेत्रे, हरी लाळगे, अशोक होले यांच्यासह अन्य काही सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. या वेळी माजी आमदार रंजना कुल, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांच्यासह संचालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)लाल दिव्यात गुंतलासर्वसाधारण सभेत जाहीर भाषणात भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक होले राहुल कुल यांना म्हणाले, की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीनंतर ‘लाल दिव्यात’ गुंतला होता. त्यामुळे दीड महिना कारखान्याचा हंगाम उशिरा झाला. परिणामी, झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण?
कार्यकारी संचालकाच्या राजीनाम्याची मागणी
By admin | Published: October 01, 2015 12:56 AM