नसरापूर (पुणे) : खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांनाही होत असलेल्या टोल आकारणीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आजपासून भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली या पाच तालुक्यांतील स्थानिकांना रहिवासी पुरावा दाखवून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर टोल स्थलांतरासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख व टोल प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली.
दरम्यान, खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी २ एप्रिलला पुकारलेल्या जनआंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस राष्ट्रीय राज्य मार्गाने प्रकल्प संचालक संजय कदम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, हवेली प्रांत अधिकारी संजय असवले, भोर प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, तसेच कृती समितीच्या वतीने आमदार संग्राम थोपटे, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनावणे, भाजपचे जीवन कोंडे, लहू शेलार, रोहन बाठे, राजेश कदम, स्वप्निल कोंडे, आदित्य बोरगे, दीपक पांगारे आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये कृती समितीने आक्रमक भूमिका मांडली. १ मार्चपासून पुन्हा सुरू करण्यात आलेली टोलवसुली तत्काळ थांबवावी व टोलनाका स्थलांतराचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली.
कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी खेड-शिवापूर टोलनाका पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरण या भागात झाले आहे. सबब हा टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलने सन २०११ पासून येथे झालेली आहेत. त्यामुळे या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक आहे.
स्थलांतराची आमची तयारी
टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटीया यांनी टोलनाका स्थलांतर करण्यास आमची तयारी असल्याचे सांगितले. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने (एनएचएआय) निर्णय घ्यावा. तर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कृती समितीने आंदोलन करू नये. टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे, असे सांगितले.