पुणे : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना तसेच संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करामधून सूट देण्यात येते. पालिकेने अद्याप अशी सूट दिलेली नाही. शासनाच्या निर्णयाला पालिकेने हरताळ फासला असून, माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मिळकतकरात तत्काळ सूट द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.
मिळतकरात सूट मिळण्यासाठी अनेक माजी सैनिक वेळोवेळी मागणी करत आहेत. परंतु, अद्याप याबाबत कोणताही निर्णय महापालिकेकडून झालेला नाही. राज्यातील अनेक महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींमध्ये या शासन निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे. पालिकेने त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी आदेश द्यावेत. ही सूट राज्य शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यात यावी, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
माजी सैनिकांना मिळकतकरात सवलत देण्याच्या योजनेचा लाभ अद्याप एकाही माजी सैनिकाला मिळालेला नाही. पालिकेने २०१० साली शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. आता, नव्याने राज्य शासनाने ही योजना आणली आहे.
----/----
महापालिकेकडे माजी सैनिकांकडून या सवलतीबाबत विचारणा होत आहे. या सवलतीच्या लाभाकरिता पालिकेच्या मिळकतकर विभागाकडे ७० पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. यासोबतच माजी सैनिकांच्या वीरपत्नींनाही या सवलतीचा लाभ मिळू शकतो. परंतु, पालिकेकडून याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने या सवलतीचा लाभ माजी सैनिकांना मिळू शकलेला नाही.