पुण्यातली तांबट आळी ही प्रसिद्ध. पण कमी झालेली मागणी आणि त्याच बरोबर इतर व्यवसायात कडे वळलेले लोक ,यामुळे इथली खासियत असणाऱ्या जुन्या वस्तू कमी होत गेल्या. इथली संस्कृती इथली खासियत जिवंत रहावी आणि लोकांना कळावी यासाठी इथलेच एक रहिवासी धडपडताहेत. आनंदी संसार या नावाने त्यांनी इथल्या या जवळपास चारशे वस्तूंचं प्रदर्शन उभारले आहे.
कसबा पेठेत राहणारे गिरीश पोटफोडे शिक्षण पूर्ण झाले तसे नोकरीला टाटा मोटर्स मध्ये फायनान्स विभागात त्यांनी अनेक वर्ष नोकरी केली. मात्र तांबट आळीतल्या वस्तूंची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्वष्टा कासार मंडळाच्या गणेश उत्सवाच्या शंभर वर्षाच्या निमित्ताने एक प्रदर्शन भरवलं गेलं. त्यावेळी मांडलेल्या वस्तू बघून पोटफोडे यांची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातच टुडे रिटायर ही झाले आणि मग त्यांनी आपल्या आवडी कडेच लक्ष द्यायचे ठरवले. आणि यातूनच उभा राहिला आनंदी संसार.
पण अर्थातच ही जुनी भांडी गोळा करणे सोपं नव्हतं . काही भांडी माझ्या घरातच होती. अगदी आजी च्या काळातले घंगाळे, बंब, अशा काही वस्तू. पण इतरही आणि वस्तू गोळा करायच्या होत्या. त्यासाठी मग परिसरातल्या ओळखीच्या लोकांपासून ते अगदी जुन्या बाजारापर्यंत सगळीकडच्या फेर्या झाल्या. एक एक करत वस्तू गोळा होत गेल्या आणि त्यातूनच हे घरगुती प्रदर्शन उभ राहिल्याचं पोटफोडे सांगतात.
आत्ता त्यांच्याकडे मोठा लहान असे बंब अष्टविनायक तांब्या भांडे ठोक्याचे ग्लास जग चहाची किटली शाळेचा डबा मानाच्या पेट्या सुरमा लावणी ,प्रवासी तांब्या बर्नर, टाळ, वजन, वजन काटा, अशा अनेक वस्तू गोळ्या झाल्या आहेत याचं त्यांनी घरातल्या घरात एक प्रदर्शनही उभे केले आहे. यासाठी पदरचे दोन लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. हे सगळं कशासाठी हे सांगताना पोटफोडे म्हणाले, " पूर्वी आमच्या तांबट आळीत तांब्या-पितळेची भांडी बनवणाऱ्या लोकांची जवळपास तीनशे घरं आणि कारखाने होते. पण आता त्यातले तीस शिल्लक राहिलेत. त्यातही अनेक जण अँटिक वस्तूंकडे वळले आहेत. त्यामुळे जुन्या पारंपरिक वस्तू नेमक्या होत्या कश्या आणि त्या मिळतात कुठे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे प्रदर्शन उभारले. माझ्या प्रदर्शनात कोण काय बनवतो याची माहिती आहे. जेणेकरून लोक ते थेट खरेदी करू शकतील."
सध्या कोरोनामुळे बंद असलं तरी एरवी पोटफोडे यांच्या कसबा पेठेतल्या घरी हे प्रदर्शन जाऊन पाहता येतं. याचं एक मोठं संग्रहालय करण्याची त्यांची इच्छा आहे.