- सिकंदर तांबोळी, कान्हूर मेसाई
चिंचोली मोराची (ता. शिरूर) व परिसरातील वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. त्याबाबत वन्यजीव मित्र तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.गेली ३ ते ४ वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरातील फळबागाही जळून खाक झालेल्या दिसून येत आहेत. त्याचा जंगलात वावरणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराला फटका बसला आहे. गेल्या वर्षी वन विभागाने या परिसरात दहा बाय दहाचे दोन फूट खोलीचे पाणथळे बांधले आहेत. गेल्या वर्षी या पाणथळ्यात वनविभागाने दैनिक लोकमतची बातमी प्रसिद्ध होताच तळी बांधून त्यात पाणी सोडले होते. मात्र, या वर्षी एप्रिलचा पहिला आठवडा लोटला तरी अद्याप त्या तळ्यात मोरांसाठी पाण्याची सोय केली नसल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळू लागल्याचे वरूडे, गणेगाव, शास्ताबाद, लाखेवाडी परिसरात पाहावयास मिळतात. वनखात्याने या परिसरातील मोरांच्या पिण्याच्या पाण्याची दखल घेतली पाहिजे; अन्यथा येथील मोर दुर्मिळ ठरण्याची भीती आहे.चिंचोली मोराची येथे मोरांचे वास्तव्य जास्त असल्यामुळे या परिसरात मोर पाहण्यासाठी मुंबई, पुणे, नगर, बारामती परिसरातील पर्यटकही हजेरी लावतात. चिंचोली मोराची हे पर्यटनस्थळ असून या ठिकाणी छोटी-मोठी सहा ते सात पर्यटनस्थळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर तसेच शेतात तयार केली आहेत. सुट्टीचा दिवस पाहून या ठिकाणी पर्यटक शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ज्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत, त्या ठिकाणी पर्यटकांसाठी पाण्याची सोय तसेच झाडांची सावली केली आहे. तर काहींनी पर्यटनाच्या नावाखाली आपली दुकाने थाटली आहे.विद्युतीकरणामुळेही मोरांचा मृत्यू- चिंचोली मोराची, वरूडे, गणेगाव परिसरातून पॉवर ग्रीड कार्पोरेशन इंडिया प्रा. लिमिटेड या विद्युत कंपनीची हायव्होल्टेज लाईन गेली असून, झाडावर बसलेले मोर उडून खाली येताना या तारेला लागून त्यांचा अनेकदा मृत्यूदेखील झाला आहे. या ४०० किलोवॅटच्या तारेला घर्षण होताच मोराचा मृत्यू होतो आहे. मात्र कंपन्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
पर्यटनस्थळाच्या इमारती धूळ खात पडून - पर्यटनस्थळाच्या इमारती धूळ खात पडून असून, चिंचोली मोराची येथे महाराष्ट्र अॅग्रो टूरिझमतर्फे पर्यटकांना राहण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बांधकामे तयार केली आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी कुस्ती ग्राऊंड, पार्किंग इत्यादी इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र, इमारती १० वर्षांपासून धूळ खात पडलेल्या अवस्थेत दिसून येत असून, इमारतींपुढे उंच झाडे, काटेरी झुडपांची वाढ झालेली दिसून येत आहे.