पुणे : स्वारगेट बसस्थानकात नुकतीच तरुणीवर बलात्काराची घटना घडली. यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. महिला सुरक्षा आणि प्रवाशांची होणारी लूट थांबावी, यासाठी लवकरच स्वारगेट बसस्थानकावर प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे रेल्वे स्थानकात काही महिन्यांपूर्वी प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा प्रवाशांना होत आहे. पुण्यातील स्वारगेट, छत्रपती शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तीनही बसस्थानकांवरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. शिवाय रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या जास्त असते. प्रवाशांना बसस्थानकात उतरल्यावर निश्चित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. परंतु या संधीचा फायदा काही रिक्षाचालक घेतात आणि प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून लूट करतात. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवास करता यावा, यासाठी सुरुवातीला स्वारगेट बसस्थानकावर इन आणि आउट गेटवर प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार असून, नियमानुसार दर आकारले जातात. त्यामुळे होणारी आर्थिक लूट थांबणार आहे.
एसटीतून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय महिला, ज्येष्ठ व इतर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वारगेट बसस्थानकातून लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रक्रिया सुरू असून, याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. -प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग
पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणे स्वारगेट बसस्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी लागणारी परवानगी घेण्यात येत आहे. सर्व प्रक्रिया झाली की, प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. -केशव क्षीरसागर, बघतोय रिक्षावाला संघटना