- नीलेश जंगम, पिंपरीशहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत. त्यामुळे प्रशस्त रस्ते अशी ओळख असलेल्या शहरामधील नागरिकांना सातत्याने वाहतूक-कोंडीला सामोरे जावे लागत आहे.पाडवा, अक्षयतृतीया, दसरा, दिवाळी अशा सणांचे औचित्य साधून लोक वाहने खरेदी करीत असतात. याशिवाय वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असे निमित्तही वाहनखरेदीला सोडले जात नाही. यामुळे वाहनसंख्येत वाढ होत चालली आहे. सार्वजनिक वाहतूक न वापरता लोक खासगी वाहतूक सुविधेला जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कामासाठी, हाकेच्या अंतरावर जाण्यासाठीसुद्धा लोकांना वाहनाची सवय झाली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ तर झाली आहेच, शिवाय अपघातही वाढू लागले आहेत.निगडी-तळवडे रस्ता, फुगेवाडी ते खडकी, रावेत-औंध रस्ता, भोसरी-मोशी या रस्त्यांसह वाकड, हिंजवडी, भोसरी, देहूरोड या प्रमुख उपनगरात तसेच, नाशिक फाटा, काळेवाडी फाटा, चापेकर चौक, साने चौक या चौकांमध्ये सुद्धा वाहतूककोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे. कमीत-कमी अंतर कापण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा लागत आहे. शहरात नोकरी,व्यवसाय व शिक्षणासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून लोक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली व वाहनांची संख्याही वाढली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) हद्दीत लोणावळा ते दापोडी, हिंजवडी, मान ते राजगुरूनगर, मंचर या सर्व भागांचा समावेश होतो. या भागातील वाहनांची नोंदणी चिखलीतील आरटीओत होते. एप्रिल २००२ ते मार्च २००३ या आर्थिक वर्षात आरटीओ हद्दीत दोन लाख ३६ हजार ८०१ दुचाकी, ६० हजार ६९८ चारचाकी वाहनसंख्या होती. २०१४-१५ या वर्षात दुचाकींची संख्या ९ लाख ६५ हजार ७१२ तर, चारचाकी वाहनांची संख्या ३ लाख २६ हजार ८४ पर्यंत पोहोचली. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत १३ वर्षांत तब्बल पाचपट वाढ झालेली दिसून येत आहे. खासगी वाहनांचा वापर वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, तापमान व प्रदुषणातही वाढ होत आहे. शाळा आणि महाविद्यालयात असतानाच पाल्यास पालकांकडून वाहने दिली जातात. शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते व अपघातांचे प्रमाणही वाढते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची, गरज भासू लागली आहे.- महेंद्र रोकडे, सहायक आयुक्त वाहतूक विभागसार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याची गरजबस, रेल्वेसोबत भविष्यातील रिंग रोड, मेट्रो, ट्रॉमा आदी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तरच, स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होणार आहे. प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रशस्त रस्ते, तरीही वाहतूककोंडी!
By admin | Published: February 24, 2016 3:32 AM