पिंपरी : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर प्रभाग आठच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला, तर भारतीय जनता पक्षाचा फाजील आत्मविश्वास नडला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सेना-भाजपाच्या लढाईत काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. निकालानंतर सेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विद्यानगर प्रभाग क्रमांक प्रभाग आठचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला होता. त्यानंतर शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यानंतर जात प्रमाणपत्राचा विषय प्रचारातही गाजला होता. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही भाजपा आणि सेनेच्या उमेदवारांवर टीका केली होती. अधिक अपत्य, बाहेरील वॉर्डातील उमेदवार, नगरसेवक, कार्यकर्त्यांची फोडाफोडी अशा विविध घटनांनी, तसेच आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. या निवडणुकीत एकूण बारापैकी सात जणांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे सतीश भोसले, राष्ट्रवादीचे दत्तात्रय मोरे, भारतीय जनता पक्षाचे भीमा बोबडे, शिवसेनेचे राम पात्रे, भारिप बहुजन महासंघाच्या शारदा बनसोडे असे पाच उमेदवार रिंगणात होते. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. भाजपाचे खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांनी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे कोणत्या पक्षाचा विजय होणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे सेना, भाजपा की, राष्ट्रवादी अशी चर्चा रंगली होती. निकालात शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसने या प्रभागाच्या निवडणुकीत जोरदार ताकद लावली होती. योग्य नियोजनामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांना फाजील आत्मविश्वास नडला. भाजपा, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाची आब राखण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
सेनेच्या अपेक्षा उंचावल्या
By admin | Published: April 19, 2016 12:57 AM