पुणे : मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते. मागील दहा दिवसांपासून जो प्रकार देशात घडत आहेत. याबाबत अनेकजण याविषयी चर्चा करू असे म्हणतात. परंतु चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. आम्ही हे केले नाही असे पाकिस्तान बोलत आहे. त्यांना खोट बोलण्याची सवयच आहे. आपला देश अनेक बाबतीत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतु आपल्या आपापसातच दुफळी निर्माण व्हावी असा इतरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण एकत्र राहून काम केले तर सैनिकांना देखील बळ मिळेल,असे प्रतिपादन मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी केले. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशदवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशिधरन नायर शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवार,चंद्रप्रकाश फाऊंडेशन व इतर संस्थांच्यावतीने ह्यजरा याद करो कुबार्नीह्ण या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमांतर्गत शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या कुटुंबियांना एक लाख बावन्न हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, वीरमाता लता नायर, वीरपत्नी तृप्ती नायर, नवचैतन्य हास्ययोग परिवारचे विठ्ठल काटे, सुमन काटे, पोपटलाल शिंगवी, प्रकाश धोका, मकरंद टिल्लू उपस्थित होते. भूषण गोखले म्हणाले, आपला देश हुशार असून खूप पुढे जाऊ शकतो. परंतु आपणच आपापसात भांडून एकमेकांचे शत्रू बनत चाललो आहे. आपल्यात कशी फूट पडेल यासाठी काही देश टपून बसलेच आहेत. त्यामुळे आपल्या देशात सगळ्यांनी एकी करणे महत्त्वाचे आहे,तृप्ती नायर यांच्या आई शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या सासूबाई निलेखा पेंटा यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, आमच्या अशा कठीण प्रसंगात संपूर्ण देश आमच्या पाठिशी असल्याने आम्ही धीराने या सगळ्याला तोंड देत आहोत. तुमचे असेच सहकार्य, आधार आणि प्रेम आमच्याबरोबर कायम असू द्या. विठ्ठल काटे म्हणाले, आपल्यासाठी आपले सैनिक जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करीत असतात. त्यामुळे सैनिकांना आपण आज हे सांगणे गरजेचे आहे की तुम्ही एकटे नाही सर्व देश तुमच्या पाठिशी आहे.--------------------------------------------
वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 6:46 PM
मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते.
ठळक मुद्दे अनेकजण याविषयी पाकिस्तानशी चर्चा करू असे म्हणतात. परंतु, चर्चेची वेळ निघून गेली आता