पुणे : हातउसणे घेतलेले पैसे परत मागणाऱ्या महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी हडपसर भागात घडली होती. दरम्यान, आरोपीने या महिलेचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संतोष किसन हंडगर (वय ३०, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संबंधित महिलेच्या एका नातेवाईकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडगर याने ४० हजार तर त्याच्या मित्राने ९० हजार रुपये या महिलेकडून उसणे घेतले होते. हे पैसे सतत परत मागत असल्यामुळे त्याने या महिलेलाच पळवून नेल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. संतोष हंडगर संबंधित महिलेकडून हातउसने पैसे घेतले होते. मात्र, ते देण्यासाठी महिला तगादा लावत असल्याने हंडगर याने त्यांना पळवून नेले. या प्रकरणी हंडगर याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या महिलेचे अपहरण केल्यावर साथीदारांच्या मदतीने तिचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. (प्रतिनिधी)
पैशांसाठी तगादा; महिलेचे अपहरण
By admin | Published: December 26, 2016 3:33 AM