पुणे : वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी या मेट्रोच्या विस्तारीकरणाचा डीपीआर महापालिका प्रशासनाने तत्त्वतः मान्य केला आहे. वनाज ते चांदणी चौक १.२ किमी आणि रामवाडी ते वाघोली ११.६३ किमी यासाठी ३हजार ६०९ कोटी, खडकवासला ते खराडी २५.८६ किमी आणि पौड फाटा ते माणिकबाग ६.११ किमी या मेट्रो मार्गसाठी ९ हजार ०७४ कोटी खर्च येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांसाठी एकुण १२ हजार ६८३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सध्या वनाज ते रामवाडी या अंशतः सुरू मेट्रो सेवा झालेल्या मार्गावरील उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग वनाजपासून ते चांदणी चौकापर्यंत असा १. २ किलोमीटर आणि रामवाडीपासून वाघोलीपर्यंत ११.६३ किलोमीटर पर्यंत वाढवला जाणार आहे. केंद्र व राज्याकडून प्रत्येकी २० टक्के रक्कम या प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. उर्वरित ६० टक्के रक्कम ही वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात उभारली जाईल. या कर्जाची जबाबादारी महामेट्रोकडे असणार असून, महापालिकेला खर्च करावा लागणार नाही. केवळ भूसंपादनासाठी दोन्ही मार्गासाठी प्रत्येकी २४ लाख आणि ६.७७ कोटी असे एकूण कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत.