पुणे - तीरा कामत या मुलीच्या दुर्मिळ आजारावर उपचार यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील वेदिका शिंदे, ह्या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार-1 असल्याचे निदान झाले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून 2 वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाच्या आई-वडिलांच्या प्रयत्नांना, समाजिक पाठिंब्यालाही यश मिळालं. अखेर, वेदिकाला 16 कोटींचं इजेक्शनही देण्यात आलं. पण, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. आता, तीरा कामतप्रमाणेच पिंपरीतील तन्वी या चिमुकलीलाही दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली.
एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. वेदिकाच्या पालकांनी क्राऊड फंडींच्या माध्यमातून 14.3 कोटी जमा केले. तर सरकारी यंत्रणांकडून कर आणि आयात शुल्क माफ करण्यामध्ये पालकांना यश आले. त्यानंतर, वेदिकाला हे इंजेक्शनही देण्यात आले. वेदिकाच्या लढ्यात पाठिशी असलेल्या जगभरातील नागरिकांना याचा आनंद झाला. मात्र, दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी वेदिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे वेदिकाच्या मृत्यूनं अनेकांचे डोळे पाणावले. आता, पिपरीतील एका चिमुकलीवरही अशाच महागड्या उपाचाराची गरज आहे. तिच्यासाठीही मदतीची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.