पुणे: भिशीमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाने व्यावसायिक महिलला तब्ब्ल २३ लाख ७४ हजार रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी मेलूकूलम दामोदरन श्रीनिवासन, सीमा श्रीनिवासन आणि वरुण श्रीनिवासन (सर्व रा. कोलम, केरळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडीमध्ये डिसेंबर २०१५ ते जून २०२१ दरम्यान घडली. याबाबत ज्योती पंकज अगरवाल (वय ४७, रा. उंड्री) यांनी फिर्याद दिली आहे.
अगरवाल या ज्योती हॉटेल व्यावसायिक असून श्रीनिवासन यांची नोंदणीकृत कंपनी आहे. ओळखीतून त्यांनी भिशी लावण्याची विनंती श्रीनिवासन यांच्याकडे केली होती. त्यानुसार बोली भिशीतून जादा परतावा मिळण्याच्या अपेक्षेने ज्योती यांनी श्रीनिवासन यांच्या भिशीत ४७ लाख ४९ हजार ९९८ रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यातील अर्धी रक्कम श्रीनिवास यांनी ज्योती अगरवाल यांना परत केली.
मात्र, लॉकडाउनमुळे उर्वरित रक्कम २३ लाख ७४ हजार ९९९ रुपये देण्यास श्रीनिवासन कुटूंबियांना अपयश आले. त्यामुळे ज्योती अगरवाल यांची फसवणूक केल्याच्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल भाेसले अधिक तपास करीत आहेत.