पुणे : ‘‘एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून थांबायचे नाही, तर पुढे जाऊन त्या विषयावर लिहिले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना त्याची माहिती समजते. या देवराईच्या ग्रंथात शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर एक तरी देवराई अनुभवावी अशीच प्रत्येकाची इच्छा होईल. संकटग्रस्त देवराई वाचविण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे, ’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनया घाटे यांनी व्यक्त केली.
देवरायांच्या अमूल्य खजिन्याचा, गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या संशोधनाचा अभ्यास ‘पारंपारिक हरित वारसा-देवराया’ या ग्रंथात लेखिका डॉ. विनया घाटे यांनी शब्दबध्द केला आहे. त्याचे प्रकाशन मिशन देवराईचे डॉ. सुनील भिडे, भांडारकर संस्थेचे गोपाल पटवर्धन आणि निसर्गसेवक संस्थेचे विवेक वेलणकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी डॉ. घाटे बोलत होत्या. कार्यक्रमास डॉ. अजित वर्तक, डॉ. मंदार दातार, शैलजा देशपांडे, हेमंत वाळिंबे, रघुनाथ ढोले आदी उपस्थित होते. देवराईची ओळख करून देणारे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली.
भिडे म्हणाले,‘‘सामान्यांना देवराई म्हणजे काय त्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. देवराया वाचवायच्या असतील तर त्या स्थानिकांना समजावून दिल्या पाहिजेत. तरच देवरायांचे संवर्धन होईल. त्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरणार आहे.’’
पटवर्धन म्हणाले,‘‘वन वनस्पती या आपल्या संस्कृतीचा मोठा ठेवा आहे. एकीकडे ग्लिरीसीडिया वाढत असताना दुसरीकडे देवराई नष्ट होत आहे. त्यांचे जतन करायलाच हवे. त्याविरोधात आवाज उठवायला हवा. देवराईत आर्थिक पैलू देखील दडलेले आहेत. स्थानिकांची यातून आर्थिक उन्नती होऊ शकते. ते त्यांना समजावले तर देवरायांना वाचवता येईल.’’
वेलणकर म्हणाले,‘‘देवराया या ग्रंथाचे अनेक खंड निघावेत. कारण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी डॉ. घाटे यांचा प्रदीर्घ अभ्यास कामी येऊ शकतो.’’
डॉ. महेश शिंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. शेखर घाटे यांनी आभार मानले.