पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी हा विषय वाहनचालकांसाठी नेहमीच डोकेदुखीचा बनला आहे. ही चौकातील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने वाहतूक विभागाच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केला खरा; मात्र या बदलामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाल्याने एका दिवसातच हा प्रायोगिक तत्वावर राबविलेला बदल महापालिकेसह वाहतूक विभागाला बासनात गुंडाळावा लागला.विद्यापीठ चौकात पाषाण, बाणेर, औंध या भागातून येणाºया वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागासह महापालिकेने विविध उपक्रम राबविले आहेत. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. ही कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांनी एक आराखडा तयार केला होता. पाषाणकडून येणाºया वाहतुकीमध्ये उड्डाणपुलाचा खांब येतो, त्याच्या दोन्ही बाजूने वाहने जातात. त्यावर उपाय म्हणून खांबाच्या एका बाजूने तात्पुरते बॅरिगेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली. मात्र या बदलामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे काही तासांतच हा बदल मागे घेण्यात आला.
प्रायोगिक बदल गुंडाळला, विद्यापीठ चौकातील वाहतूक प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:43 AM