पुणे : मासिक पाळीतील रक्त हे रक्त व मांसपेशींचे अस्तर असते जे गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर फेकले जाते. याचा अशुद्धता, अपवित्रता किंवा पवित्रता याच्याशी कसलाही संबंध नसतो. गर्भाशय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाळी येते, मग ती कोणत्याही देशातील, जातीतील, धर्मातील असो. त्याचा संबंध कोणत्याही एका धर्मासोबत जोडणं आणि त्याआधारे कोणतेही धार्मिक विधी करणं किंवा धार्मिक विधी करायला मज्जाव करणं हे दोन्ही ही धर्माच्या नावाखाली शाेषण केले जात आहे.
जादूटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त विकण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. पुण्यात माहेर असलेल्या महिलेसाेबत बीड जिल्हयात सासरी हा किळसवाना प्रकार घडला. सासरच्या मंडळींनी तिचे हात पाय बांधून पाळीतील रक्त जमवण्यास भाग पाडले व ते ५० हजार रुपयांना मांत्रिकाला विकले. या प्रकाराची तक्रार सामाजिक संस्थेच्या मदतीने तिने पुण्यात केली व त्यानुसार नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानिमित्ताने मासिक पाळीशी निगडीत अंधश्रद्धा आजही किती मुळ पकडून आहेत हे दिसून येते. विशेषकरून ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रकार नव्याने पुढे येत आहेत. तसेच पाळीच्या काळात महिलांना सन्मानजन्य वागणूक मिळतेय का हा प्रश्न ही पुन्हा उपस्थित झाला आहे. पाळीच्या रक्ताचा वापर करून जादू्टोणा करणं ही तर दुहेरी फसवणूक आणि दंडनीय गुन्हा आहे, अशी भुमिका मासिक पाळीबाबत जनजागृती करणा-या समाजबंध संस्थेने मांडली आहे.
...तर अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल
पाळीच्या काळात महिलेला सकस आहार, पुरेसा आराम, स्वच्छता आणि सकारात्मक वागणूक मिळणं हा प्रत्येक महिलेचा मानवाधिकार आहे. या चारही बाबींचं उल्लंघन या गुन्हयात घडलेलं आहे. ज्या काळात तिला आराम मिळालं पाहिजे त्या काळात तिचे हातपाय बांधणं, रक्त जमा करण्यासाठी तिच्या शरीरासोबत छेडछाड करणं हे विकृत आणि अमानवी वागणं आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली तर अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. - सचिन आशा सुभाष, समाजबंध