यवत : भांडगाव (ता. दौंड) येथील मीनाक्षी कंपनीमध्ये भीषण दुर्घटना घडून तप्त वितळलेले लोखंडाचा द्रव अंगावर पडून सात कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून, चार कामगारांना लोणी काळभोर येथील, तर तीन कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना आज (दि. ३१) सकाळी ९ वाजता घडली. तप्त लोखंडी द्रव पडून कामगार जखमी झाल्यानंतर तेथे आॅक्सिजन टाकीचा मोठा स्फोट होऊन परिसर हादरून गेला. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह इतर चौघा आरोपींच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महाराष्ट्राबाहेरील प्रांतातील आहेत.सदर दुर्घटनेत कामगार संतोष रामप्रसाद पाल (वय १९, बांदा, ता.करवीर, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश), लवलेश रमेश पाल (वय १८, रा. बांदा, ता. करवर, जि. चित्रकूट उत्तर प्रदेश), अमित लालचंद पासवान (वय ३०, रा. बाजीडीमहुआ ता. मिरगंज, जि. गोपालगंज, बिहार), रामप्रसाद ताठी (वय ३०), अबुजर क्रीम खान (वय ३०), संतोष कुमार (वय २१), रमेश पाल (वय १८) जखमी झाले आहेत.याबाबतची फिर्याद संतोष रामप्रसाद पाल (रा.भजनी, ता. करावीर, जि. चित्रकूट उत्तर प्रदेश) यांनी पोलिसात दिली असून, पोलिसांनी कंपनीचे मालक आरोपी ओमप्रकाश अग्रवाल, संजीव रॉय, जयप्रकाश सिंग, दिनेश पाल (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मीनाक्षी कंपनीमध्ये भंगार लोखंड वितळवून त्यापासून उपयोगात येणारे लोखंड बनविले जाते. लोखंड वितळविण्यासाठी येथील भट्टीत एक हजार चारशे डिग्री पर्यंत तापमान असते. इतक्या तापमानात लोखंड पूर्णपणे वितळते. यानंतर भट्टीतून वितळलेले द्रवलोखंड काढून साचात ओतले जाते. आज सकाळी सदर काम सुरू असताना भट्टीतून तप्त लोखंडी द्रव साचात ओतण्यासाठी नेत असताना क्रेनमधून द्रव नेण्याचे भांडे खाली पडल्याने द्रवाखाली काम करणाºया कामगारांच्या अंगावर हा तप्त द्रव पडला. यामुळे सात कामगार गंभीर स्वरूपात भाजले.कंपनी बद्दल स्थानिक ग्रामस्थांबरोबरच ग्रामपंचायतीने देखील वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.स्फोटबाबत यवत पोलीस अहवालाच्या प्रतीक्षेत...सकाळी मीनाक्षी कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर स्फोटाचा मोठा आवाज भांडगावमधील सर्वच नागरिकांनी ऐकला होता. मात्र याबाबतची माहिती यवत पोलिसांनी पत्रकारांना देताना कंपनीत लोखंडी द्रव सांडून कामगार भाजले असल्याची माहिती दिली. मात्र स्फोट झाला की नाही, हे माहीत नसून औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी चौकशी करून सांगितल्यानंतर याची माहिती देऊ, असे सांगितले. मात्र गावातील दादा टेळे, विजय दोरगे व दत्ता महानवर यांनी स्फोट झाल्याचे पोलिसांना सांगूनदेखील फॅक्टरी इन्स्पेक्टर काय अहवाल देतात त्यावरून सत्य समोर येईल, असे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.'अद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांच्याकडे अपघाताबाबत माहिती विचारली असता कंपनीमध्ये कामगारांच्यासुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली नव्हती. तसेच लोखंडी द्रवसांडल्यानंतर तेथे आॅक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती पत्रकारांना दिली. संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करून तसा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.
भांडगावला कंपनीत स्फोट, आॅक्सिजन टाकीचा धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 2:53 AM