या प्रकरणी कालिदास संपत झेंडे (रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून गणेश जयसिंग सरक (रा. मीरगाव ता. फलटण, जि. सातारा) व खाडे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध दि.२८ मार्च रात्री साडेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी आज दिली.
याबाबतची हकीकत अशी की दिनांक २८ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली. त्यामुळेच या परिसरातील मल्हारगड हॉटेलच्या मागे शेतातील विहिरीच्या खोदकामासाठी हे जिलेटिन आणले होते. त्याचा अचानक स्फोट झाल्याने दोन हॉटेल्स व एका चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपी गणेश सरक यांनी इंदापूरच्या खाडे नामक इसमाकडून बेकायदेशीररीत्या जिलेटिनच्या कांड्या या विहिरीच्या कामासाठी आणल्या होत्या. स्फोटानंतर परिसरात आवाज झाल्याने खळबळ उडाली होती. शिवाजी विश्वास कटके यांच्या मारुती इको गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मनुष्यहानी झाली नाही. इथून काही अंतरावर असलेल्या दुसरे एक सवाई हॉटेलच्या भिंतींनाही आतून तडे गेले. त्यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते .
घटनास्थळाचा पंचनामा करून त्याबाबत फिर्याद घेऊन भारतीय दंड विधान कलम २८६ स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ३५६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.