सांगवी (बारामती ) : सांगवी (ता. बारामती ) येथील भारत गॅस एजन्सी मालकाच्याच घरी शनिवारी सकाळी १० च्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत वाशिंग मशीन, कपाट व गादीसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. वाशिंग मशीनचे शॉर्टसर्किट झाल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे गॅस एजन्सी मालक अरुण गव्हाणे यांनी सांगितले.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या पाठीमागील बाजूस मोठी लागल्याने घरातील महिलांनी आग विझविण्यासाठी परिसरातील तरुणांना मदतीसाठी बोलावले. स्फोटादरम्यान मोठ्याने आवाज येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी भीती व्यक्त केली. यावेळी परिसरातील ४ ते ५ तरुणांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. बादली व मिळेल त्या साहित्याने आग विझविण्यात यश मिळवले. तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेने आग आटोक्यात आली. यावेळी अग्निशमन दलाला देखील पाचारण करून राहिलेली आग नियंत्रणात आणण्यात आली. यावेळी तीन ते चार टाक्याना आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्श नागरिकांनी दिली. यावेळी एका कामगाराच्या हाताला भाजले आहे.
तर यामध्ये लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. स्पोट दरम्यान शेजारील तरुणांनी इतर गॅस सिलिंडर टाक्या विझवून बाहेर फेकून दिल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला. गॅसची एजन्सी चालविणाऱ्याच्याच घरातच सिलिंडरचा स्पोट झाल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यावेळी माळेगाव पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.
गोडाउनमधील २० ते २५ मोकळ्या कमर्शियल सिलेंडरच्या टाक्या घरी आढळून आल्या. तसेच घराच्या पुढील आवारात सिलेंडरने भरलेला एक पीकअप पुढे उभा करण्यात आला होता.आग लागताच हा पीकअप देखील तेथून हलविण्यात आला. यावेळी आग विझवताना गेस एजन्सी मधील कामगार भाजला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यामुळे परिसरातील लोकांनी पुन्हा असे विघातक प्रकार घडू नये यासाठी गॅस एजन्सी मालकाच्या घरी सिलेंडरच्या भरलेल्या व मोकळ्या टाक्या न ठेवण्याची मागणी गेली आहे. यामुळे सिलेंडरच्या टाकीचा स्पोट नेमका कशामुळे झाला यावर परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडला तपासात लवकरच उघड होईल.