राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोना काळात म्हणजे एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात भारतातून ५८ हजार ७६ कोटींची फळफळावळ व शेतमालाची परदेशात निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचा १३ हजार ८७७ कोटींचा असून द्राक्ष आणि आंबा निर्यातीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
देशातील शेतमला परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्याचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत. राज्यानेही स्वतंत्र निर्यात कक्ष तयार केला आहे. फळे व भाजीपाल्यांसाठी ४५ प्रकारच्या संगणकीय यंत्रणा तयार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना निर्यातक्षम माल तयार करण्यापासून ते परदेशी बाजारपेठ शोधण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाते. या माध्यमातूनच कोरोना काळात राज्याने २ हजार २५० कोटींची द्राक्ष निर्यात केली. देशाची द्राक्षांची एकूण निर्यात २ हजार २९० कोटी रुपयांची आहे. राज्याचा त्यातला वाटा ९८.२५ टक्के आहे. केळी आणि आंबा निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर असून अनुक्रमे ४५५ व १९२ कोटींची निर्यात झाली आहे. देशात या दोन्ही फळांमध्ये राज्याचा वाटा अनुक्रमे ७३.८६ व ८९.७२ टक्के आहे.
निर्यात कक्षातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फळं व भाजीपाल्याच्या निर्यातीत महाराष्ट्राला मोठा वाव आहे. परदेशात कांदा, टोमॅटो, मिरची, प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्याला मोठी मागणी असते. सध्या अशा प्रकारच्या निर्यातीत राज्याचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र शेतकऱ्यांनी निर्यातक्षम माल उत्पादित केला, त्यासाठी सरकारी यंत्रणेची मदत घेतली तर यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात निर्यात करता येऊन परदेशी बाजारपेठ ताब्यात घेता येऊ शकते.
------
द्राक्ष वगैरेसाठी प्लॉटची नोंदणी करून मागणी करणारे देश सांगतील त्याप्रमाणेच, त्याच औषधांची फवारणी करावी लागते. या सर्व गोष्टी आपल्या शेतकऱ्यांनी सवयीच्या करून घेतल्या तर महाराष्ट्राला शेतमाल निर्यातीत अजून भरपूर वाव आहे. आमचा तोच प्रयत्न आहे
गोविंद हांडे- राज्य सल्लागार, निर्यात कक्ष.
----------
निर्यात
फळे
देश: ७२०१ कोटी / राज्य: ४०८५
भाजीपाला
देश: ६६३४ / राज्य: २६९०
शेतमाल धान्य
देश: ४०१३४ / राज्य: ५८२८
प्रक्रियायुक्त माल
देश: ४१०७ / राज्य: १२७४