लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातून यंदा २ हजार कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली. कर्नाटक राज्याचे १०२ मेट्रिक टन वगळता राज्याने तब्बल १ लाख ८० हजार ९९४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केली आहेत. त्यात नाशिक जिल्हा नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकावर आहे.
इग्लंड, नेदरलँड, जर्मनी, फिनलँड अशा युरोपियन देशांमध्ये १ लाख ५६ हजार ७४४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. नॉन युरोपियन म्हणजे अरब कंट्री व अन्य देशांत ७५ हजार २५० मेट्रिक टन द्राक्ष गेली. या निर्यातीसाठी एकूण १३ हजार २३० कंटेनर लागले.
राज्यातील द्राक्ष निर्यात करणाऱ्या जिल्ह्यात नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. ९५ हजार ३२१ मेट्रिक टन यावर्षी एकट्या नाशिकमधून निर्यात केली गेली. सांगलीमधून ५ हजार ९९८ मेट्रिक टन, तर साताऱ्र्यातून २ हजार १३९ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या द्राक्ष निर्यातीचे प्रमाण १७७ कोटी रुपयांनी कमी आहे. मागील वर्षी २ हजार १७७ कोटी द्राक्ष निर्यात झाली होती. मात्र असे असले तरी यंदा मागील वर्षीपेक्षा युरोपियन देशांमध्ये जास्त निर्यात झाली आहे. यंदा युरोपात राज्याने १ लाख ५ हजार ७४४ मेट्रिक टन द्राक्ष पाठवली. मागील वर्षी ९२ हजार ३४२ मेट्रिक टन निर्यात युरोपात झाली होती.
---
द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र देशात कायमच आघाडीवर राहिला आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कौतुकास पात्र आहेत. द्राक्षाची शेती फार नाजूक असते, मात्र सर्व नैसर्गिक आपत्तीवर आधीच काळजी घेऊन काही प्रमाणात का होईना, पण द्राक्ष उत्पादक शेतकरी मात करतातच.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, राज्य कृषी विभाग