मंचर : पुणे-नाशिक महामार्ग प्रस्तावित बाह्यवळण रस्ता हा नवीन स्वरूपात होणार असून, त्या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. बाह्यवळण रस्त्याला विरोध करणार असून, शेतकऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती शेतकरी बचाव कृती समितीचे नियंत्रक प्रभाकर बांगर यांनी दिली. यासंबंधित रविवारी बैठक होणार आहे.दरम्यान राजगुरुनगर बाह्यवळणाच्या पहिल्या टप्प्याच्या मोजणीसाठी १० व ११ नोव्हेंबर रोजी आलेल्या महामार्ग, मोजणी व भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केल्याने मोजणी सध्या थांबविण्यात आली आहे.आंबेगाव तालुक्यातून हा रस्ता कसा जाणार आहे, त्याच रस्त्याचे रुंदीकरण होणार की बाह्यवळण रस्ता होणार याबाबत संभ्रमावस्था होती. मागील काही दिवसांपासून याबाबतची चर्चा तसे आंदोलने थांबली होती. केवळ पेठ-अवसरी घाटात काम सुरू होते. आज बाह्यवळण रस्त्यासंदर्भात राजपत्र प्रसिद्ध होऊन आंबेगाव तालुक्यातील गावातील बाह्यवळण रस्त्यात जाणारे गट नंबर व क्षेत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात मंचर, शेवाळवाडी, मोरडेवाडी, निघोटवाडी, एकलहरे, कळंब या आंबेगाव तालुक्यातील गावांचा तसेच जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी, वडगाव आनंद, आळेफाटा या गावांचा समावेश आहे. वरील गावांतील राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेतकरी बचाव कृती समितीने बाह्यवळण रस्त्याला यापूर्वी विरोध केलेला आहे. त्यामुळे पुढील काळात बाह्यवळण रस्त्याला ठामपणे शेतकरी विरोध करतील, अशी माहिती कृती समितीचे नियंत्रक प्रभाकर बांगर व डॉ. सुहास कहडणे यांनी दिली. (वार्ताहर)
बाह्यवळण नव्या स्वरूपात
By admin | Published: November 22, 2014 12:42 AM