बारामती : गर्भलिंग तपासणी करून पत्नीला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी बारामती तालुक्यात ग्रामसेवक पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी सक्रिय असलेल्या टोळीचा पाठपुरावा घेत असताना भिगवण पोलिसांनी दोन डॉक्टरांसह दोन महिला, ड्रायव्हर ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या तीन चारचाकी गाड्यादेखील ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी कारवाई करून म्हसवडच्या दोन डॉक्टरांसह भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील महिला, ड्रायव्हर आणि त्यांच्या तीन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या. या टोळीकडून अनेक गंभीर बाबींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आज सकाळी कारवाई केल्यानंतर सायंकाळी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याबाबतची गोपनीयता भिगवण पोलिसांनी बाळगली होती. भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आणखी काही बाबींची माहिती शनिवारी मिळणार आहे, असे सांगितले. स्त्री गर्भाची गर्भपात करणारी टोळीच ताब्यात आल्याने त्यांच्याकडून झालेल्या अनेक गंभीर बाबी उघड होतील, तसेच अन्य भागातील धागेदोरेदेखील मिळणार आहेत. डॉ. एकनाथ इरप्पा चंदनशिवे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. तुषार पिंताबर गाडे (वय ५४, रा. म्हसवड, जि. सातारा), डॉ. हनुमंत ज्ञानेश मोरे (वय ५४, कोरगाव, जि. सातारा), संतोष किसन जाधव (रा. खडकी पाटोळे, जि. सातारा), काशिनाथ किसन मोरे (रा. खडकी, ता. दौंड) तर गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्या दोघी माळशिरस तालुक्यातील आहेत. डॉक्टरांची गाडी (क्रमांक एमएच ११/बीव्ही २८७३), एमएच ४५/अे ०२९ या गाड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By admin | Published: July 30, 2016 4:59 AM