पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणाचा खोलवर जात तपास केल्यानंतर आता लष्कराच्या मदतीने गुन्हे शाखेने लष्कर आणि रेल्वेतील बोगस भरतीतील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
भारत कृष्णा काटे (वय ४१, रा. मु़ पो़ राजुरे, ता. सांगोला, जि़ सोलापूर) राजेंद्र दिनकर संकपाक (रा. सातारा), दयानंद जाधव आणि बि. के. सिंग (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सलमान गौरुउद्दीने शेख (वय २१, रा. मु़ पो़ करडखेल, लव्हारा, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर गुन्ह्याच कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे तसेच आय टी अॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील विविध ठिकाणी हा प्रकार ऑगस्ट २०२० मध्ये घडला आहे.
आरोपींनी आपआपसात संगनमत करुन सलमान, शिवाजी जाधव आणि नवनाथ जाध यांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यांची खरोखरच भरती केली जात असल्याचे भासविण्यासाठी त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांशी, रांची, लखनौ, जबलपूर येथे बोलावून घेतले. तसेच पुण्यातील घोरपडी येथील आर्मी कार्यालयासमोरही आरोपींनी त्यांची भेट घेतली. त्यांनी हेडकॉर्टरल आर्मी या नावाने बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे चौघांकडून १३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली.
याबाबतची लष्कराच्या इंटेलिजन्सला इनपुट मिळाले होते. त्यानुसार पुणेपोलिसांनी लष्कराच्या मदतीने सोलापूर येथून दोघांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लष्कर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष झिरो टॉलरन्स असावी, यासाठी आर्मीचा कटाक्ष आहे. त्यातून अशा गुन्ह्यांमध्ये लष्कराकडून पोलिसांना माहितीची देवाण घेवाण करण्याबरोबर तपासात संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे सर्दन कमांडच्या वतीने सांगण्यात आले....पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्कर भरतीतील पेपरफुटी प्रकरणात लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांना अटक करुन मोठे रॅकेट उद्धवस्त केले होते. त्यासाठी लष्कराच्या मदतीने देशातील विविध भागातून लष्करी अधिकार्यांना अटक केली आहे. लष्कर व रेल्वे भरती प्रकरणात मोठे असण्याची शक्यता असून त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.