पुणे: बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटाचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या एजंटांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस या उच्चभ्रु सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. तेथे वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोघा एजंटांना अटक करण्यात आली. कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आला. पिडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशन येथे सरंक्षणार्थ ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर, उपनिरीक्षक प्रिया राजगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मते, पोलीस अंमलदार श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, तानाजी सागर, महिला पोलीस शिपाई बागवान, परकाळे यांनी केली आहे.