प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : मराठी चित्रपटसृष्टीतून बॉलीवूडसारखी श्रीमंत नाही. बहुतांश मराठी कलाकारांनी सामान्य कुटुंबातून येत शुन्यातून विश्व उभे केले आहे. त्यामुळे बॉलीवूडप्रमाणे अजून तरी ड्रग संस्कृती फोफावलेली नाही. मात्र, व्यसनाधीनता हा पूर्णत: वैयक्तिक विषय असल्याने मत कलाकारांनी व्यक्त केले. त्याचवेळी, सोशल मिडिया आणि ट्रोलिंग हा कलाकारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे, ही बाब अधोरेखित झाली.
कंगना राणावतने व्टिटरवरुन केलेली वक्तव्ये, बॉलीवूडमधील व्यसनाधीनता, परस्पर वादंग यामुळे चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, आजकाल केवळ कलाकारांमधील व्यसनाधीनतेवर बोट ठेवले जाते, अशी खंत मराठी कलाकारांनी व्यक्त केली आहे. कलेची नशा असेल तर कृत्रिम व्यसनांची गरज भासत नाही. कलाकार आजकाल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असल्याने काही कलाकारांनी याबाबत मत व्यक्त करण्यास नकार दिला. कलाकारांनी कोणतीही भूमिका मांडली तरी लोक वाईट पध्दतीने ट्रोलिंग करतात. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर मर्यादित ठेवण्यावर कलाकार भर देऊ लागले आहेत.-----------------मराठी कलाकार आयुष्यात स्थैर्य मिळवण्याइतका पैसा कमावतात. फार मोजक्या कलाकारांना मोठी रक्कम मिळते. बॉलीवूड, दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीइतकी मराठी चित्रसृष्टी श्रीमंत नाही. पैसा व्यसनधीनतेकडे वळण्यास प्रवृत्त करतो. व्यसनाधीनता हा कलाकारांना मिळालेला शाप आहे. कोणतेच व्यसन नाही, असे अगदी बोटावर मोजण्याइतके कलाकार आहेत. व्यसनाधीनता बाजूला ठेवली तरच आपण मानसिक स्थैर्य, सामाजिक भान, वैयक्तिक आयुष्य यांचा मेळ साधून उत्तम आयुष्य जगू शकतो. व्यसनाधीनतेतून करिअरमध्ये तात्पुरते यश मिळेल, मात्र वैयक्तिक आयुष्य ढासळते, प्रतिमा डागाळते. माझ्या माहितीनुसार, मराठी इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचे कल्चर नाही. मात्र, मद्यपान, धुम्रपानाने अनेक कलाकारांना व्यसन असते. त्यामुळे कलाकारांनी सजग राहून योग्य निर्णय घ्यावेत.
- प्राजक्ता माळी, अभिनेत्री-----------------------------बहुतांश मराठी कलाकारांनी सामान्य कुटुंबातून वर येत शुन्यातून विश्व उभे केले आहे. थिएटरची पार्श्वभूमी, गुरुकूल पध्दतीची ओळख त्यांना आहे. मराठी कलाकार बॉलीवूडपर्यंतची मजल मारण्याच्या क्षमतेचे आहेत. आपल्याला कलेची नशा पुरेशी असेल तर इतर गोष्टींकडे मन ओढले जात नाही. सोशल मिडिया हे कलाकारांसाठी सध्या भीतीदायक वास्तव ठरत आहे. कलाकारांनी कोणतीही भूमिका घेतली तरी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. कलाकारांनी केलेली चांगली कामे सोयीस्कररित्या विसरली जातात आणि चिखलफेक केली जाते. पदरी मनस्तापच पडणार असेल तर का घ्यायची भूमिका? मराठी माणूसच मराठी कलाकारावर चिखलफेक करतो. जाती-धर्मावर घसरुनही टीका केली जाते. अशा पध्दतीची गळचेपी होणार असेल तर सोशल मिडियाचा वापर मर्यादित ठेवून कामावर लक्ष केंद्रित करणे केव्हाही चांगले. मतमतांते असावीत, चर्चा व्हाव्यात. मात्र, पातळी सोडली जाऊ नये.
- मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री------------------------------व्यसनाधीनता केवळ कलाकारांपुरती मर्यादित नसते. व्यसन कोणताही माणूस करु शकतो. दुर्देवाने गेल्या काही काळात मनोरंजन क्षेत्रातील केवळ व्यसनाधीनतेकडेच लक्ष वेधले जात आहे. करमणूक हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. चित्रपटसृष्टीतील व्यसनांवरच बोलणे हे मला खटकते. व्यसने करावीत की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरुन केवळ कलाकारांना लक्ष्य करणे योग्य नाही. कलाकारांनी सोशल मिडियावर काहीही मत मांडले तरी कोणीतरी दुखावले जाते आणि ट्रोलिंगला सुरुवात होते. सध्या लॉकडाऊन, कोरोना यामुळे लोक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर जास्त रोष निघतो आहे, असे मला वाटते. कलाकारांना कोणतीही भूमिका घ्यायची मुभा राहिलेली नाही.- अमेय वाघ, अभिनेता--------------सोशल मिडियावर आजकाल अत्यंत वाईट पध्दतीने ट्रोलिंग केले जाते. केवळ कलाकारच नव्हे, तर नागरिक म्हणून कोणालाही, विशेषत: एखाद्या स्त्रीला ट्रोलिंगचा जास्त सामना करावा लागतो. याबाबत कडक कायदा अमलात येणे अपेक्षित आहे. ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे. भित्रट लोक वाईट पध्दतीने ट्रोल करत असल्याने संबंधित व्यक्तीला मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही लोकांना शिक्षा झाल्यास याला चाप बसू शकेल. सोशल मिडियाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र स्त्रीबाबत अश्लाघ्य भाषा, अश्लील टिपण्णी करणे, एखाद्याला जात-धर्मावरुन ट्रोलिंग करणे असे वर्तन करणा-यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
- चिन्मय मांडलेकर, अभिनेता