लासुर्णे : इंदापूर भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस संतोष भोसले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी एका पत्रकान्वये दिली.
गोतोंडी (ता. इंदापूर) येथे दि. २३ मार्च रोजी झालेल्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणतीही सूचना नसताना बैठकीस हजर राहून बैठकीत गोंधळ घातला, तसेच तालुक्यात पार्टीची बदनामी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती असल्याचे शेंडे यांनी दिली. येथील संतोष भोसले हे भाजप युमोचे इंदापूर तालुका सरचिटणीसपदी काम करीत होते. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी गोतोंडी (ता. इंदापूर) येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिली होती. या बैठकीत भोसले यांनी गोंधळ घालून पक्ष कामकाजात अडथळा निर्माण केला. यामुळे पक्षाकडून आपण सतत असे प्रकार असून, कार्यकर्त्यांना धमकावणे, त्रास देणे, कामकाजात अडथळा निर्माण करणे यामुळे तालुक्यात भारतीय जनता पार्टीची बदनामी होत असल्याने संतोष भोसले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली. तसेच पुढील काळात भोसले यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला तसेच बैठकीला हजर राहता येणार नाही. यापुढे पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही पक्षाच्या वतीने देण्यात आले.