पुणे : कोरोनाचा पुन्हा एकदा नव्याने उद्रेक पाहायला मिळतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे. दरम्यान, लसीकरणाची मोहीम देखील जोरदार सुरु आहे. मात्र लसीकरणानंतर सुद्धा कोरोना संसर्ग झाल्याची काही उदाहरणे समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, लसीकरणाच्या पहिला डोस व दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवावे,अशी मागणी राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे आणि पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी राज्य शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
डॉ. सुभाष साळुंखे पत्रात म्हणतात, जागतिक स्तरावर कोरोनाचे नवे नवे स्ट्रेन आढळून येत आहे. आणि नवीन स्ट्रेनचा संसर्ग भारतात देखील पोहचला असून काही रुग्णही सापडले आहे. मात्र, आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लस देताना सर्वसाधारणपणे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन अशाच दोनच प्रकारच्या लस दिल्या जात आहे. ज्या जुन्या स्ट्रेनच्या कोरोनाचा अभ्यास करून तयार केल्या आहेत. त्याचा प्रभाव नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाच्या स्ट्रेनवर कितपत होतो आहे हे तपासणे गरजेचे आहे.
सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन ही लस टोचली जात आहे. या लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारण २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या डोस मध्ये असलेले अंतर वाढविण्यात यावे अशी मागणी डॉ. साळुंखे आणि आशिष भारती यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांपासून ते पुढील तीन आठवड्यात कधीही घेतला तरी चालेल असे स्पष्ट केले आहे.
तसेच कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची ९० टक्के शक्यता असते. तर दुसरा डोस घेतल्यानंतर १० टक्के शक्यता आहे. मात्र कोरोना संक्रमण टाळणाचा धोका टाळणे हा कोरोना लसीकरणापाठीमागचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर कोरोनाची सौम्य लक्षणे आढळतात आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असे कोरोनाच्या मानवी चाचण्यांमधला निष्कर्ष आहे. त्यामुळे अत्यवस्थ स्थिती निर्माण न होण्यासाठी लस दिली जात आहे, असेही साळुंखे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
डॉ. आशिष भारती म्हणाले, १३ मार्च रोजी मी कोरोना लसीचा पहिला दपोस घेतला. पण चार दिवसानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र मला कोणत्याही प्रकारचे कोरोना लक्षणे नाही. मी सुस्थितीत आहे. तसेच माझ्या पत्नीने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी तिला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोना लसीकरणाच्या दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील कालावधी वाढविणे गरजेचे आहे.