केडगाव: शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासाठी असलेल्या विमा योजनेचा कालावधी डिसेंबर २०२० ला संपला असून तो वाढविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे.
गौतम कांबळे म्हणाले की, कोरोना काळात शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांनी आपले कर्तव्य बजावले आहे. कोरोना संक्रमित लोकांच्या थेट संपर्कात येत असूनही आदेशाप्रमाणे काम करत असल्यामुळे या शासकीय कर्मचारी, शिक्षकांना सर्वात जास्त संक्रमण होण्याचा धोका आहे व मृत्यू ओढवला जाऊ शकतो, तरी वरील संदर्भीय वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०२० या संदर्भीय पत्रानुसार देण्यात आलेली मुदत वाढ संपली असून डिसेंबर २०२१ पर्यंत ही मुदतवाढ करण्यात यावी. ५० लाख शासन विमा कालावधी वाढवून त्याचा लाभ शिक्षक बांधवासहीत सर्व शासकीय कर्मचारी जे कोरोना कार्यात स्थानिक पातळीवर आदेशीत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना विमा योजनेचा लाभ देण्यात यावा. ५० लाखाचा विमा शासन निर्णय वित्त विभाग दिनांक २९ मे २०२० अन्वये दिनांक १४ ऑक्टोबर २०२० या शासन निर्णयात मुदत वाढ करावी. तसेच कोविड कामकाजात सहभागी असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ देण्यात यावा. शिक्षक बांधव व इतर सर्व कोविड योद्धे यांच्या कुटुंबीयांना हा विमा विनाविलंब मिळावा व शासन निर्णयास मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे विनंती केली आहे.