पुणे : स्थायी समितीने मिळकतकराची थकबाकी वसुल करण्यासाठी आणलेल्या अभय योजनेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या योजनेमधून पालिकेच्या तिजोरीमध्ये ३५४ कोटी रुपयांची भर पडली आहे. ३० नोव्हेंबर रोजी मुदत संपलेल्या या योजनेला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी ५० पेक्षा अधिक नगरसेवकांनी केली आहे. प्रशासनाकडूनही मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्यात येणार आहे.
अभय योजनेने कोरोना काळातही पालिकेला चांगला फायदा मिळाला आहे. थकबाकी वसुलीसाठी पालिकेने २ आॅक्टोबरपासून ही योजना लागू करण्यात आल्यानंतर ५० लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्यांना दंडामध्ये ८० टक्के सूट देण्यात आली. करोनाकाळातही तब्बल १ लाख १२ हजार मिळकतधारकांनी ३५४ कोटींची थकबाकी जमा केली आहे. अनेक नागरिकांना कोरोना काळात उद्भवलेल्या अडचणींमुळे या योजनेचा लाभ घेता आलेला नाही.
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहेत. अनेकांनी थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली आहे. या मिळकतधारकांसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सर्वपक्षिय नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे या योजनेला आणखी एक महिना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायीसमोर ठेवण्यात येणार आहे.