पुणे : महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषीसंजीवनी योजनेस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेच्या धर्तीवर राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना सुरू करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे.कृषीसंजीवनी योजनेअंतर्गत कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे ३१ मार्च २०१४ अखेर असलेल्या मूळ थकबाकीची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास मूळ थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ होणार आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. ३१ मार्च २०१४ ला शेतकऱ्यांकडे असलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेवरील व्याज व दंड महावितरणकडून माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जून २०१४ नंतर आलेली चालू वीजबिले भरणे आवश्यक आहे.कृषिसंजीवनी योजनेच्या धर्तीवरच राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना २०१५ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनांच्या जून २०१५ अखेर असलेल्या वीजबिलांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा समान हप्त्यांत भरावयाची आहे. (प्रतिनिधी)
कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ
By admin | Published: November 14, 2015 1:32 AM