पुणे : यंदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते. त्याला १४ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक तंत्रशिक्षण विभागाकडून काढले आहे. विद्यार्थ्यांना आणखी ४ दिवसांची मुदत मिळाली असून या काळात जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांना महाविद्यालयांमध्ये जमा करावे लागणार आहे. यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.आभियांत्रिकी पदवी, औषनिर्माणशास्व व फार्म डी, वास्तुशास्त्र पदवी, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ मिळणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिली होती. मात्र अद्यापही काही विद्यार्थ्यांना हे सादर करता आले नाही. त्यामुळे राज्य शासन आणि बार्टीचे मुख्य समन्वयक यांनी प्रमाणपत्र सादर करण्याच्या अंतिम तारखांना मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना १४ आॅगस्टपर्यंत हे प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. जे विद्यार्थी मुदतीत प्रमाणपत्र सादर करू शकणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे डॉ. वाघ यांनी स्पष्ट केले आहे.
जात पडताळणीला १४ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:00 AM