पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सतरा क्रमांकाचा अर्ज भरणाची मुदत वाढविण्यात आली आहे. खासगीरीत्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्क भरून दि.३० डिसेंबरपर्यंत नोंदणी अर्ज भरता येईल.
नावनोंदणी भरण्याची मुदत २८ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. मंडळाने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज व शुल्क भरता येईल. ३१ डिसेंबरपर्यंत मूळ अर्ज, ऑनलाईन शुल्क भरलेल्या पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावे लागतील. त्यानंतर ५ जानेवारी रोजी संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करतील. विद्यार्थ्यांचे केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
--------