पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट महिन्यांत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत मंडळाने २१ जूनपर्यंत वाढविली आहे.
अर्ज भरण्यासाठीची मुदत शुक्रवारी संपली आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने मुदत वाढ दिली असून, विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह २१ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत, तर विलंब शुल्कासह २२ ते २५ जून या कालावधीत अर्ज करता येतील. दहावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर क्रेडिट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.
परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दहावीसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येतील. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.
ऑनलाईन अर्ज भरताना मार्च-२०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल. परीक्षेला प्रथमतः प्रविष्ट झालेल्या व श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४ अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील.
नियमित, विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात आणि आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशा सूचना मंडळाकडून माध्यमिक शाळांना देण्यात आल्या आहेत.