पुणे : संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनधारकांना उत्पन्न दाखला सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एका पत्राद्वारे, संजय गांधी निराधार पेन्शन योजनाधारकांनी आर्थिक वर्ष २०२२-२०२३चा उत्पन्न दाखला ३० जूनपर्यंत जमा करणे बंधनकारक राहील अन्यथा तहसील कार्यालयाकडून संबंधितांची योजना बंद करण्यात येईल. असे सूचित केले होते.
या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांना मुदतवाढ मिळावी म्हणून पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा मनीष आनंद यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनात पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीने उत्पन्न दाखला सादर वा जमा करण्याची मुदत ३१ जुलै २०२२ पर्यंत करण्याची विनंती केली, तर मुदतवाढ झाल्यास पेन्शनधारकांना नवीन उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, अशी भूमिका मांडली होती. याची त्वरित दखल घेत जिल्हाधिकारी, पुणे यांनी मुदतवाढीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव स्वाती शिंदे, ॲड. मोनिका खलाने, ॲड. राजश्री अडसूळ, ॲड. अश्विनी गवारे, पल्लवी सुरसे, प्राची दुधाने, सोनिया ओव्हाळ आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.