पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक (दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) च्या परीक्षेसाठी १७ क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी दि. ३० सप्टेंबरर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. २० ते ३० सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज व ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्क स्वीकारण्याचा कालावधी इयत्ता दहावीसाठी दि.१४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर व इयत्ता बारावीसाठी दि. १० ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला होता. जे विद्यार्थी नावनोंदणी करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे.
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी http://form17.mh.ssc.ac.in या तर बारावीसाठी http://form17.mh.hsc.ac.in या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.