लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतीकामात गुंतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान पीकविमा योजनेची मुदत आता २३ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत १५ जुलै होती. आतापर्यंत राज्यात खरीप हंगामासाठी ५६ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
गेल्या वर्षी या योजनेत खरिपासाठी राज्यातून १ कोटी ७ लाख ७० हजार ८२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४ लाख ९९ हजार ६५७ जणांना ९७४ कोटी १८ लाख रुपयांचा विमा मिळाला. विमा हप्त्याचा २ टक्के हिस्सा म्हणून शेतकऱ्यांनी ५३० कोटी ६ लाख रुपये जमा केले होते. नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य काही कारणाने होणाऱ्या नुकसानीत आधार म्हणून बहुसंख्य शेतकरी पीकविम्याचा लाभ घेऊ लागले आहेत. पीकनिहाय विमा हप्ता आणि मिळणाऱ्या लाभाचे प्रमाण वेगवेगळे आहे.
यंदा सुमारे ५७ लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेचे अर्ज दाखल केले असून, यातून ३२ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. यावर्षी पावसाने ताण दिला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे विमा योजनेची मुदत वाढवून मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार ती आता २३ जुलै केल्याचे कृषी विभागाने सांगितले.
चौकट
जिल्ह्यातली स्थिती
“जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ७१७ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. गेल्यावर्षी २८ हजार ४३७ जणांंनी विमा घेतला होता. त्यांनी टक्के प्रमाणे ९८ लाख रुपये जमा केले होते. त्यातील ४ हजार ३७२ शेतकऱ्यांचा विमा मंजूर होऊन त्यांना २ कोटी ११ लाख १४ हजार रुपये भरपाई मिळाली.”
-प्रमोद सावंत, तंत्र अधिकारी, कृषी विभाग