लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ सुरु होताच प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी संकेतस्थळ सुरू होताच त्यावर अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे सुरुवातीला संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू होते. तसेच काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पालकांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी घोषणा शिक्षण संचालनालयकडून करण्यात आली आहे.
२०२१-२०२२ या वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ३ मार्चला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. प्रवेशासाठी सुरुवातीला ३ मार्च ते २१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु दि. ११ ते १५ मार्च या कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे पालकांना अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच कोरोनाच्या पार्शवभूमीवर काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तसेच आता तांत्रिक अडचणही दूर झाली आहे. त्यामुळे सन २०२१-२०२२ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना अर्ज करण्याकरिता ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेशासाठी राज्यभरामध्ये ९४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्च पर्यंत https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.