लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एप्रिल अखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने दिनांक २६ मार्च २१ च्या पत्राद्वारे १ फेब्रुवारी २० नंतर मुदत संपणारी योग्यता प्रमाणपत्रे, परवाना, अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्रासाठी ३० जून २१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील परिवहन कार्यालयांमध्ये शासनाने निर्देशित केल्यानुसार अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये काम करावयाचे आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या विविध अटी विचारात घेता परिवहन कार्यालयात खालील प्रमाणे काम चालू ठेवावे अथवा नाही या संदर्भात सूचना खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्जदाराच्या उपस्थितीविना शक्य असणारी कामे सुरू ठेवावीत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
नवीन नोंदणी :
अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटर वाहन निरीक्षकाने अप्रूव्ह (approve) केले आहे अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील.
वाहनविषयक काम :
वाहन ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करावीत. नव्याने कोणतेही अर्ज स्वीकारू नयेत.
योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण :
अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येऊ नये.
परवानाविषयक कामकाज :
वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणारी सर्व परवानाविषयक कामकाज चालू ठेवावे.
शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती बंद राहील.
अनुज्ञप्तीविषयक इतर कामे :
सारथी ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करावीत. नव्याने अर्ज स्वीकारू नयेत.
अंमलबजावणी विषयक कामकाज :
अंमलबजावणी पथकाने रस्ता सुरक्षेशी निगडित वाहनांची तपासणी करावी, वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्रथम करावे, सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खासगी प्रवासी बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चेन ‘Break the Chain’ अंतर्गत covid appropriate behaviour मध्ये जारी केलेल्या सूचना प्रमाणे होते असल्याची खातरजमा करावी, सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमितपणे चालू राहील.