पुणे: गुजरातमधील आनंद येथील अमूल डेअरी ही देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचाच गैरफायदा घेत आनंद येथील सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याचा बहाणा करुन तब्बल १० लाख ४२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यासाठी सायबर चोरट्यांनी आनंद येथील इंडियन बँकेच्या खात्याचा वापर केल्याचे आढळून आले आहे.
याबाबत एका ६९ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरटा व बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार ३ ऑगस्ट ते ३ सप्टेबर दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन अमूल डेअरी डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याचा बहाणा केला. त्यासाठी त्यांच्या पतीला वेगवेगळी कारणे सांगून बँक खात्यावर पैसे पाठवायला सांगितले. गुजरातमधील आनंद येथे अमूलचा मुळ उद्योग आहे. त्यामुळे तेथील इंडियन बँक खात्यात पैसे भरायला सांगितल्याने फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास बसला. अशा प्रकारे त्यांनी एका महिन्यात तब्बल १० लाख ४२ हजार रुपये भरले. तरीही त्यांच्याकडून मागणी होत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहे.