पिंपरी : व्हिडीओ लाइक केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून २१ हजार २७० रुपये देऊन तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर धमकी देऊन अडीच लाख रुपये उकळण्यात आले. आळंदी रोड, दिघी येथे ६ जून ते १८ जुलै या कालावधीत ही घटना घडली.
मयूरेश मारुती पाटील (२८, रा. आळंदी रोड, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित मोबाइल क्रमांकधारक तसेच इन्स्टाग्राम आयडीधारक, बँक खातेधारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी मयूरेश यांना व्हाॅट्सॲपवरून मेसेज पाठवून वेगवेगळे टेलिग्राम आयडी पाठवले गेले. त्यावर व्हिडीओ लाइक करण्यास सांगितले. लाइक केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले. नंतर मयुरेश यांच्या बँक खात्यात २१ हजार २७० रुपये पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना प्रीपेड टास्क देऊन वेगवेगळ्या यूपीआय आयडी आणि बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. मयूरेश यांनी पैसे भरले नाहीत. त्यामुळे त्यांना खोटे कर्ज दिल्याचे दाखवून त्यांना व घरच्यांना त्रास देण्याची तसेच नोकरीच्या ठिकाणी कळवून नोकरी घालवण्याची संशयितांनी धमकी दिली. त्यामुळे मयूरेश यांनी दोन लाख ६४ हजार रुपये भरले.