पिंपरी : भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर खंडणीचा मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये लांडगे यांच्याकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा व्हाटसअप क्रमांक आहे. या व्हाटसअप क्रमांकावर मंगळवारी (दि. ४) सायंकाळी अज्ञाताने मेसेज केला. ३० लाख रुपयांची खंडणी द्या, अन्यथा पुढील परिणामाला तयार रहा, खंडणीचे १० लाख रुपये बँक खात्यात जमा करा आणि उर्वरित रक्कम एका ठिकाणी असलेल्या गाडीत ठेवा, अशा आशयाचा मेसेज अज्ञाताने केला आहे. तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार लांडगे यांना जीवे मारण्याची धमकीही अज्ञातांनी मेसेजमधून दिली आहे. परिवर्तन हेल्पलाईनचे काम करणाऱ्या यश पवार (वय २०) यांनी हा मेसेज मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बघितला.
यश पवार यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारची धमकी काँग्रेसचे पुणे येथील माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील आली होती. अशाच प्रकारे खंडणीची मागणी करून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना धमकी दिल्याची घटना समोर आली.