पुणे : भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगून ६० लाख रूपये घेऊन जमीन न देता फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर पोलिस अधिकाऱ्यालाच धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भीती घालून आणखी ६ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी आंबेगाव येथे राहणाऱ्या एका ५९ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियांका नीलेश सूर्यवंशी (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरू होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका पोटे यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना शेतजमीन खरेदी करून दिली नाही. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे धमकावले व आर्थिक नुकसान करण्याची भीती घातली. ते सहायक पोलिस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी घेतली. या पोलिस अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून, त्यानुसार फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.