पिंपरी : गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल क्रमांक अपलोड करून ऑनलाईन खंडणी मागणाऱ्या कोलकाता येथील टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला. कॉल सेंटरवर छापा टाकून ते चालविणाऱ्या सहा जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सुरजकुमार जगदीश सिंग (वय २७), नवीनकुमार महेश राम (२३), सागर महेंद्र राम (२३), मुरली हिरालाल केवट (२४), अमरकुमार राजेंद्र राम (१९), घिरनकुमार राजकुमार पांडे (२५, सर्व रा. दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझाजवळ कोलकाता, पश्चिम बंगाल, मुळ - झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ स्मार्ट मोबाईल, ७ व्हाईसचेंज मोबाईल्स, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबीट कार्ड, ८ आधार कार्ड, पॅनकार्ड, ८ नोटबुक असा ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, १५ मे रोजी किरण नामदेव दातीर (३५, रा. डुडूळगाव) यांनी ऑनलाईन पैसे मागितल्याच्या कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा मावस भाऊ सौरभ शरद विरकर (वय २६) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयित सुरजकुमार व त्याच्या साथिदारांनी किरण यांच्या मोबाईलवर संपर्क करून त्यांचा व्हॉटसॲपचा डीपी काढून त्यांच्या फोटोची छेडछाड केली. त्यांचा फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून किरण यांना वारंवार कॉल करून पैसे मागितले.
संशयितांनी १२ हजार रुपये बँक खात्यावर स्वीकारून पुन्हा वेगवेगळ्या फोनवरून कॉल करून त्यांना ब्लॅकमेल केले. पुन्हा त्यांच्याकडे ५१ लाख रूपये मागितले. पैसे दिले नाही तर सर्व फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी किरण यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संशयिताना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकामार्फत या प्रकरणाचा समांतर तपास चालु होता.
पोलिसांनी संशयित वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित निष्पन्न केले. ७ जून रोजी पथक संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. संशयित नगेर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, फ्लॅटवर छापा टाकून संशयितांना जेरबंद करण्यात आले.
दिघीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक नितीन अंभोरे, फौजदार सुनील भदाणे, पोलिस अंमलदार किशोर कांबळे, सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
टोळीची अशी होती कार्यपद्धती...
अटक संशयित नवीन सिमकार्ड विकत घेऊन 'जी-मेल'वर बनावट नावाने खाते तयार करत असत. त्याआधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल क्रमांक अपलोड करत असत. त्यावर फोन आल्यावर कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वत:च्या खात्यावर पैसे स्विकारुन पिडीतांचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेत असत. त्याच्यासोबत आय-किल कंपनीच्या व्हाईसचेंज मोबाईलद्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करून त्यावरून पीडितांच्या मोबाईल क्रमांकाद्वारे त्याच्या सोशल मीडियावरून फोटो प्राप्त करून घेत असत आणि तेच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉटसॲपवर पाठवत असत. त्यानंतर त्याला वारंवार कॉल करून पैशाची मागणी करून पैसे स्वीकारत असत. तसेच, कोणी तक्रार करू नये म्हणून फक्त ५ ते १० हजार रुपये स्वीकारत असत.