पुणे : आत्महत्येच्या खोट्या गुन्ह्यात वृद्ध बांधकाम व्यावसायिकाला अडकविण्याची भीती दाखवून तब्बल २० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तत्कालीन केअर टेकरला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी अमित शिंदे (वय ३८, रा. सदाशिव पेठ, लक्ष्मीरोड), स्नेहल शिंदे ऊर्फ आमराळे (वय ३२), सचिन दिलीप बोराडे, संजय राजू गोडकर (रा. कोथरुड) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ७३ वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून, ते त्यांच्या पत्नीसोबत कर्वेनगर येथे राहतात. त्यांचे कार्यालय सदाशिव पेठेत आहे. संशयित आरोपी अमित हा फिर्यादी यांच्या घरी केअर टेकर म्हणून नाेकरीला हाेता. बंगल्यातील दोन खोल्यात राहत असे. फिर्यादीची पत्नी स्नेहल ही दि. ६ जुलै २०२२ रोजी सकाळी फिर्यादीच्या लक्ष्मी रोड येथील कार्यालयात गेली. तिने फिर्यादीला तुमच्यामुळे माझ्या पतीने मला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे मी रस्त्यावर आली आहे, असे सांंगितले.
तसेच पतीने मला २० लाख देण्याचे कबूल केले होते, त्याने मला ते दिले नाहीत, ते तुम्ही द्या म्हणत त्यांच्याकडे २० लाखांची मागणी केली. याबाबत अमितला विचारणा केली असता त्याने मी तिला कोणत्याही प्रकारे पैसे देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने फिर्यादींना गोळ्या खाऊन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अमितने फिर्यादीला माझ्या पत्नीने आत्महत्या केली असून, तिने पोलीस आयुक्तांना फिर्यादीच्या नावे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी दिली. त्यामध्ये फिर्यादीने तिला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यातून नाव कमी करायचे असेल तर २ लाख रुपये पोलिसांना द्यावे लागतील, असे सांगितले. दि. २३ जुलै रोजी अमित याने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून ६ लाखांची मागणी केली.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने फिर्यादी यांनी आपल्या मित्रामार्फत संबंधित भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चौकशी केली. त्यावेळी त्यांना असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, कर्मचारी हर्षल दुडम, अशोक माने, मयूर भोसले, सताप्पा पाटील यांच्या पथकाने सिंहगड रोड व कोथरुड परिसरातून चाैघांना ताब्यात घेतले.